सिल्लोड, (प्रतिनिधी): पवित्र रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ईदगाह येथे नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या सूचने नुसार नगर परिषदेच्या वतीने आवश्यक त्या सर्व सोयी सुविधांची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी ईदगाह कमिटी तसेच पोलीस, नगर परिषद विज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह ईदगाह परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून करण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, वीज वितरण विभागाचे शाखा अभियंता धम्मपाल मस्के , न. प. तील स्वच्छता सभापती अकिल वसईकर, नगरसेवक रउफ बागवान, नंदकिशोर सहारे आसिफ बागवान, सत्तार हुसेन, चांद बेग, जुम्मा खा पठाण, नूर मोहम्मद कुरेशी, शे. सलीम हुसेन, बबलू पठाण, ईदगाह कमिटीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद हनिफ, हाजी शेख अय्युब, मोईन पठाण, मुस्ताक देशमुख, फहिम पठाण, उपमुख्याधिकारी अजगर पठाण, नगरपरिषदेतील प्रशासकीय अधिकारी जुबेर सिद्दिकी, स्वच्छता निरीक्षक अन्वर पठाण, प्रकल्प समन्वयक देवेंद्र सूर्यवंशी, शेख सलमान, अब्दुल बाशीद, शेख मुख्तार आदींची उपस्थिती होती.
यावेळी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण परिसराची विशेष साफसफाई करण्यात आली आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्याची पुरेशी व्यवस्था, वीजपुरवठ्याची अखंडित व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे. तसेच नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.
पार्किंगची सोय, आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकेची तयारी आणि वैद्यकीय पथकाची उपलब्धता त्यासोबतच ईद सणानिमित्त मुबलक पाणी पुरवठा व सुरळीत वीजपुरवठा याबाबतही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.









